काय आहे 75 Hard Challenge? वाचा फिटनेस जगतातील या अनोख्या ट्रेंड बद्दल

मित्रांनो, सध्या इन्स्टाग्राम व यूट्यूबवर खूप वायरल असलेल्या 75 हार्ड चॅलेंज बद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. अलीकडे बरेच खेळाडू, फिटनेस इंफ्लुएनसर, आणि सेलेब्रिटी हे 75 Hard Challenge पूर्ण करण्याच्या मागे लागले आहेत. या लेखात आपण जाणून घेणार आहोत याच 75 हार्ड चॅलेंज बद्दल ( What is 75 Hard Challenge ).

75 Hard चा इतिहास

75 हार्ड चॅलेंजची संकल्पना अँडी फ्रिसेला ( Andy Frisella ) नामक उद्योजकाने 2019 मध्ये मांडली होती. अँडी फ्रिसेला हा 39 वर्षीय यूट्यूबर 1st Phorm नामक हेल्थ सप्लिमेंट बनवणार्‍या कंपनीचा मालक आहे. अँडी फ्रिसेला सांगतो की 75 हार्ड चॅलेंज हे निव्वळ एखादे फिटनेस चॅलेंज नसून मानसिक कणखरता वाढवण्यासाठीचा परिवर्तनात्मक संकल्प आहे. अँडीला 75 हार्ड चॅलेंजची कल्पना जेम्स लॉरेंसची ( James Lawrence ) मुलाखत घेताना सुचली. जेम्स लॉरेंस हा सलग 100 दिवसात 100 आयर्नमॅन ट्रायथलॉन पूर्ण करणारा एकमेव धावपटू आहे. त्याच्या म्हणण्यानुसार मानसिक बळ विकसित करण्यासाठी तुम्ही जाणूनबुजून स्वतःला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढल पाहिजे.

75 हार्ड चॅलेंजचे नियम ( 75 Hard Challenge Rules )

75 हार्ड हा 75 दिवसीय संकल्प आहे ज्याचे 5 नियम आहेत. हे पाच नियम चॅलेंज स्वीकारणार्‍या व्यक्तिला 75 दिवसांसाठी रोज न चुकता पाळावे लागतात. एखाद्या दिवशी यातील एकही नियम मोडल्यास पुन्हा पहिल्यापासून चॅलेंजची सुरुवात करावी लागते.

पहिला नियम – रोज पौष्टिक आहार घेणे

75 हार्ड चॅलेंजचा पहिला नियम आहे रोज पौष्टिक आहार घेणे अथवा ठराविक डाएट पाळणे. ही डाएट पाळण्याचा उद्देश शारीरिक विकास करणे असावा. तुमचे ध्येय वजन कमी करणे, मसल बिल्डिंग, वजन वाढवणे, इत्यादी असू शकते व त्यानुसार तुम्हाला या चॅलेंजसाठी तुमची डाएट ठरवावी लागते. सोबतच 75 हार्ड चॅलेंज पूर्ण करत असताना खालील गोष्टी वर्ज्य असाव्यात:

  • दारू, सिगरेट, तंबाखूचे व्यसन
  • पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी सारखे बाहेरचे पदार्थ
  • चहा, कॉफीचे अति सेवन
  • पॉर्न फिल्म पाहणे किंवा हस्तमैथुन करणे
  • तळलेले किवा मैदा असलेले पदार्थ खाणे
दुसरा नियम – दिवसातून दोनदा 45 मिनिट व्यायाम करणे

75 हार्ड चॅलेंजचा दुसरा नियम आहे दिवसातून दोनदा 45 मिनिट व्यायाम करणे. यातील एक व्यायाम घरात किंवा जिममध्ये करावा व दुसरा व्यायाम मैदानात करावा. घरातील व्यायामात तुम्ही योग, जोर बैठक, सूर्यनमस्कार वगैरे करू शकता. मैदानी व्यायामात तुम्ही खेळ खेळणे, धावणे, जॉगिंग वगैरे करू शकता. शक्य असल्यास मैदानी व्यायाम सकाळच्या सुंदर वातावरणात करावे जेणेकरून शरीराला आवश्यक असलेली शुद्ध हवा आणि कोवळं ऊन मिळेल आणि तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल. 

तिसरा नियम – रोज 3.5 लीटर पाणी पिणे

75 हार्ड चॅलेंजचा तिसरा नियम आहे रोज 3.5 लीटर पाणी पिणे. भरपूर पाणी पिण्याचे असंख्य फायदे आहेत. त्वचा, केस, प्रतिकारशक्ती, पचन, इत्यादी चांगले ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचे वय, वजन, व ऋतुनुसार दिवसाला 2.5 ते 3.5 लीटर पाणी प्यावे. सामान्यतः शरीराच्या दैनंदिन गरजेसाठी आपल्या वजनाच्या प्रत्येकी किलोमागे 30 ते 40 मिलिलीटर पाणी पिणे उत्तम. उदाहरणार्थ, तुमचे वजन 60 किलो असल्यास दिवसाला 60 X 30 ते 60 X 40 मिलिलीटर म्हणजेच कमीतकमी 2 ते 2.5 लीटर पाणी पिणे आवश्यक आहे.

चौथा नियम – नॉनफिक्शन पुस्तकातील 10 पान वाचणे

75 हार्ड चॅलेंजचा चौथा नियम आहे कुठल्याही नॉनफिक्शन म्हणजेच काल्पनिक कथा नसलेल्या पुस्तकातील 10 पान रोज वाचणे. यामध्ये ऑडिओ बुकचा समावेश नसावा. या कार्यात तुम्ही एखाद्या थोर व्यक्तीचे आत्मचरित्र, श्रीमद भगवद गीता, सेल्फ हेल्प बूक वगैरे वाचू शकता.

पाचवा नियम – प्रोग्रेस सेल्फी काढणे

75 हार्ड चॅलेंजचा पाचवा नियम आहे रोज एक प्रोग्रेस सेल्फी काढणे. असे केल्याने तुम्हाला तुमच्यात होणारे सकारात्मक बदल प्रत्यक्षपणे बघण्याची संधी मिळते. चॅलेंज पूर्ण केल्यानंतर तुमच्या पहिल्या दिवसाच्या सेल्फी व पंचाहत्तराव्या दिवसाच्या सेल्फीमधले अंतर पाहून स्वतःचा खूप अभिमान वाटतो. आपण एक अवघड मोहीम फत्ते केल्याची भावना शब्दात मांडण्यापलीकडे असते.

75 Hard चे फायदे

75 हार्ड चॅलेंज पूर्ण करणे जितके आव्हानात्मक आहे तितकेच जास्त फायदे हे चॅलेंज पूर्ण करण्याचे आहेत. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी शिस्त व मनोबल असणे गरजेचे आहे. 75 हार्ड चॅलेंज पूर्ण करण्याचे काही फायदे:

  • आत्मविश्वास वाढतो
  • धैर्य, चिकाटी व मनोबल वाढते
  • वाचनाची आवड निर्माण होते
  • आरोग्य चांगले राहते
  • अंगाला शिस्त लागते

75 हार्ड चॅलेंज मोफत टेंप्लेट ( 75 Hard Challenge Tracker Free )

75 हार्ड चॅलेंज सुरू केल्यावर बर्‍याच मंडळींना रोज पूर्ण केलेल्या कार्यांची नोंद ठेवणे अवघड जाते. 75 दिवसांची सोप्या पद्धतीने नोंद ठेवण्यासाठी आम्ही मोफत डाऊनलोड व प्रिंट करता येईल अशी टेंप्लेट तयार केली आहे. ही टेंप्लेट मिळवण्यासाठी आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा व टेंप्लेट डाऊनलोड करा. तसेच, तुम्ही 75 हार्ड चॅलेंज सुरू अथवा पूर्ण केले असल्यास तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला नक्की कळवा.

3 thoughts on “काय आहे 75 Hard Challenge? वाचा फिटनेस जगतातील या अनोख्या ट्रेंड बद्दल”

Leave a Comment