बुद्धिबळ खेळल्याने वाढते पुरुषांमध्ये Testosterone पातळी? काय आहेत बुद्धिबळ खेळण्याचे फायदे?

अझरबैजान येथे नुकत्याच पार पडलेल्या FIDE Chess World Cup स्पर्धेत भारताच्या 18 वर्षीय R Praggnanandhaa ने अंतिम फेरीत विश्वविजेता Magnus Carlsen विरुद्ध दमदार कामगिरी केली. त्याचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले असले तरी त्याने इतक्या लहान वयात सर्वोच्च पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करून प्रत्येक भारतीयाचे मन जिंकले आहे हे मात्र नक्की. तस पहायला गेल तर भारतात बुद्धिबळ खेळण्याची परंपरा फार जुनी आहे. बुद्धिबळाचा शोध भारतात झाला असे संगितले जाते. प्राचीन काळातील ‘चतुरंग’ या पटावर खेळल्या जाणार्‍या खेळाचे आधुनिक स्वरूप आजचे बुद्धिबळ आहे. विश्वनाथन आनंद, विदित गुजराथी, गुकेश डी यांच्या सारखे असंख्य ग्रँडमास्टर (GM), महिला ग्रँडमास्टर (WGM), व इंटरनॅशनल मास्टर (IM/WIM) भारतात आहेत. बुद्धिबळात आज भारताचे स्थान पहिल्या पाच क्रमांकांमध्ये येते. या लेखात आपण जाणून घेणार आहोत विशेषतः पुरुषांनी बुद्धिबळ का खेळावे व त्याचे काय फायदे आहेत.

तरुणांमध्ये बौद्धिक विकसनशीलतेचे पुनरुज्जीवन करणे ही काळाची गरज

हल्ली आपण सगळेच आपल्या बाह्य रूपाला खूप प्राधान्य देतो. जसे शारीरिक सौष्ठवता वाढवण्यासाठी आपण जिमला जातो, तसे मेंदू तल्लख करण्यासाठी रोज 5 भिजवलेले बदाम खाण्यापलीकडे आपण क्वचितच काही उपाय करतो. मुळात बाह्य रूप चांगले करण्याच्या प्रयत्नात आपण आपल्या मानसिक स्वास्थ्य आणि बौद्धिक विकासाकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत. कोडे सोडवणे, वाचन करणे, सुडोकू, बुद्धिबळ या सारखे बुद्धीला चालना देणारे ‘मेंदूचे व्यायाम’ करणे आपण आजकालच्या ‘लाइफस्टाइल’ मध्ये सोडून दिले आहे. हनुमान चालीसेतील ‘बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहुं कलेश विकार‘ ही ओळ बुद्धीला मानवी जीवनात बळा बरोबरीचे स्थान असल्याचे दर्शविते. वजीराला बळ कमी असेल तरी चालते पण बुद्धी असणे गरजेचे आहे, सेनापतीला बुद्धी कमी असेल तरी चालते पण बळ असणे गरजेचे आहे, परंतु एका राजाला बळ आणि बुद्धी दोन्ही असणे फार महत्वाचे असते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या असीम बुद्धी व बळामुळे आज आपण त्यांना ‘शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत‘ (सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत असलेले ) म्हणून संबोधतो. महाराजांचा आदर्श पुढे ठेऊन आज प्रत्येक तरुणाला शारीरिक व बौद्धिक विकासाकडे मार्गावलंबन करणे ही काळाची गरज आहे. याची साधी सोपी सुरुवात आपण बुद्धिबळ खेळायला सुरू करण्यापासून करू शकतो.

बुद्धिबळ खेळल्याने पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते?

मानव किंवा इतर कुठल्याही प्रजातीच्या नरांमध्ये स्पर्धात्मक क्रिया करणे हे एक सामान्य वैशिष्ट्य आढळते. प्राण्यांमध्ये संभाव्य जोडीदाराला प्रभावित करण्यासाठी धाडस दाखवणे असो, किंवा इतर नरांपेक्षा स्वतःला अधिक बलवान सिद्ध करणे असो, यात काही शंका नाही की प्राथमिक स्तरावर पुरूषांचे वर्तन स्पर्धात्मक असण्याशी निगडीत आहे. याचा थेट संबंध निओलिथिक (आदिमानव) कालखंडात प्रदेशासाठी किंवा वर्चस्व दाखवण्यासाठी दोन जमातींच्या पुरुषांमध्ये होणार्‍या झुंजांशी लावता येऊ शकतो. आधुनिक काळात, सामाजिक नियमांमुळे, असे आदिमानवी वर्तन निषिद्ध असल्यामुळे आजचा पुरुष स्पर्धा करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधतो, मग ते खेळ, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे असो. मानवी उत्क्रांतीदरम्यान पुरुषांमध्ये स्पर्धा जिंकणे हे टेस्टोस्टेरॉन पातळी वाढवण्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडत गेले.

1992 मध्ये झालेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की सामान्यतः बुद्धिबळ स्पर्धांच्या विजेत्यांमध्ये कालांतराने टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. या संशोधनातून हे सिद्ध झाले की पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन पातळीवर फक्त शारीरिक बळाचा समावेश असलेल्या स्पर्धाच प्रभाव पाडतात असे नाही. बौद्धिक बळाचा समावेश असलेल्या स्पर्धांचाही शरीरातील टेस्टोस्टेरॉन पातळीवर प्रभाव असतो. 2020 मध्ये झालेल्या एका संशोधनात असे आढळले की बुद्धिबळात कमी रेटिंग (स्पर्धकांचे बुद्धिबळातील कौशल्य मोजण्यासाठीचे मानक) असलेल्या स्पर्धकांमध्ये जास्त रेटिंग असलेल्या स्पर्धकांविरुद्ध खेळण्या अगोदर टेस्टोस्टेरॉन पातळी वाढली होती. या दोन्ही संशोधनातून असे समजते की पुरुषांमध्ये स्पर्धा जिंकल्याने आणि आपल्यापेक्षा उत्तम प्रतिस्पर्ध्यासोबत स्पर्धा केल्याने टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाची पातळी वाढते.

बुद्धिबळ खेळण्याचे इतर फायदे

बुद्धिबळ खेळण्याचे इतर अनेक फायदे आहेत जे पुरुष आणि स्त्रीयांना समान रीतीने लागू होतात.

  • हा खेळ लोकांना एकत्र आणतो.
  • हरणे आणि जिंकणे हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत याची जाणीव हा खेळ करून देतो.
  • बुद्धिबळ खेळल्याने एकाग्रता, सर्जनशीलता, आत्मविश्वास व स्मरणशक्तीमध्ये वाढ होते.
  • बुद्धिबळ खेळताना तुम्हाला तर्क लावणे, विश्लेषणात्मक निर्णय घेणे, समरणशक्तीचा वापर करणे, पॅटर्न ओळखणे, या सारख्या गोष्टी कराव्या लागतात. यामध्ये तुमच्या मेंदूचे दोन्ही भाग एकत्र काम करतात.
  • हा खेळ तुम्हाला दबावाखाली शांत कसे राहायचे हे शिकण्यास मदत करतो.
  • बुद्धिबळामुळे उत्तम नियोजन कौशल्य प्राप्त होते.
  • बुद्धिबळ खेळल्याने वृध्दापकाळात होणार्‍या स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होतो असे 2019 मध्ये झालेल्या एका अभ्यासात आढळले.

Chess.com सारख्या मोबाइल ॲप्सवर बुद्धिबळ योग्य पद्धतीने शिकता येते. अशा ॲप्सवर आपण जगातील कुठल्याही, आपल्यापेक्षा जास्त रेटिंग असलेल्या, स्पर्धकांसोबत बुद्धिबळ खेळू शकतो. 

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि तुम्ही बुद्धिबळ खेळत असाल किंवा खेळायला सुरुवात केली असेल तर तुमचा अनुभव आमच्या सोबत शेअर करा. बुद्धिबळ खेळणे हा एक असंख्य फायदे देणारा छंद आहे. प्रत्येक तरुणाने या खेळाचा पुरेपूर उपयोग आपले व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी करावा ही आमची मनोकामना आहे.

1 thought on “बुद्धिबळ खेळल्याने वाढते पुरुषांमध्ये Testosterone पातळी? काय आहेत बुद्धिबळ खेळण्याचे फायदे?”

Leave a Comment